पुणे – आई-वडिलांच्या वाढदिवसाला फेसबुकवरील जाहीरात बघुन डबा मागवणे एका महिलेला भलतेच महाग पडले. सायबर भामट्याने संबंधीत महिलेच्या बॅंक खात्यातून 49 हजार 760 रुपये काढून घेतले. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आनंदनगर येथे रहाणाऱ्या एका महिलेच्या आई-वडिलांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस होता. तीने टिळक रस्त्यावरील एका नामांकित डायनिंग हॉलची जाहिरात फेसबुकवर पाहिली होती. त्या जाहिरातीतील नंबरवर तीने संपर्क साधून जेवणाचा डबा मागवला.
समोरील व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून त्यावर ऍडव्हांन्स म्हणून 10 रुपये टाकण्यास सांगितले. त्यांनी विश्वास ठेऊन क्रेडीट कार्डचे डिटेल्स व 10 रुपये पाठवून दिले. यानंतर त्यांना थेट 49 हजार 760 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्यांनी संबंधीत फोनवर सातत्याने संपर्क केला असता, फोन स्विच ऑफ करण्याच आला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वाघमारे करत आहेत.
चौकट : टिळक रोडवरील एका नामांकित डायनिंग हॉलच्या नावाने ऑन लाईन फसवणूकीचा हा तीसरा प्रकार आहे. यामुळे ऑन लाईन ऑर्डर देताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषत:हा फेसबुकवर अनेकदा फेक जाहिराती असल्याचे पोलिसांच्या निदर्शणास आले आहे.