Pune Crime : घरकामास ठेवलेल्या महिलेनं चोरले 15 लाखाचे दागिने; हडपसर पोलिसांकडून अटक

पुणे – घरकामास ठेवलेल्या महिलेने पंधरा लाखांचे दागिने चोरल्याची घटना हडपसर भागात घडली होती. दागिने लांबवून पसार झालेल्या महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून 28 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

बंगारेव्वा चंद्रम हराळे (49 , मूळ रा. चंद्रम, चडचण, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत विजय राजन फराटे (वय, रा. अमरनगरी, हडपसर, गाडीतळ, मूळ रा. विजयनगर, बारामती) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हराळे फराटे यांच्या घरकाम करायची. तीन दिवसांपूर्वी फराटे आई-वडिलांना वैद्याकीय तपासणीसाठी रूग्णालयात घेऊन गेले होते. त्यांनी हराळेला घराची चावी दिली होती. हराळेने घरात कोणी नसल्याची संधी साधली. कपाटातील रोकड आणि दागिने असा 14 लाख 93 हजारांचा ऐवज लांबवून ती पसार झाली.

घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर फराटे घरकामास ठेवलेल्या महिलेने दागिने चोरल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त केला होता. पोलिसांनी पसार झालेल्या हराळेचा शोध सुरू केला. ती कर्नाटकात पसार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर ती हडपसर भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने, हवालदार प्रदीप सोनवणे, नितीन मुंढे, सैदोबा भोजराव, समीर पांडुळे, संदीप राठोड आदींनी ही कारवाई केली. तिच्याकडून 14 लाख 93 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.