पाकिस्तानात 5 बलुच दहशतवाद्यांचा खात्मा

कराची  – पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी सोमवारी बलुचिस्तान प्रांतातील बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या पाच अतिरेक्‍यांना ठार केले. मस्तुंग जिल्ह्यातील स्प्लिनजी भागात गुप्तचरांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान फुटीरवादी संघटनेच्या 5 अतिरेक्‍यांना ठार मारण्यात आले, असे क्वेटामधील काउंटर टेररिझम डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हे दहशतवादी क्वेटामध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होते. त्यांच्या लपण्याच्या ठिकाणामधून स्फोटके, डिटोनेटर आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हे पाच दहशतवादी मजूर आणि सुरक्षा दलावरच्या हल्ल्यांमध्ये सहभागी होते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
चकमकीदरम्यान काही दहशतवादी अंधारात पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाई दरम्यान 10 किलो स्फोटके, तीन डेटोनेटर, दोन स्फोटकांचे रॉड, दोन ग्रेनेड, तीन कलाश्निकोव्ह रायफल्स, 100 जिवंत काडतुसे, एक रिमोट कंट्रोल डिव्हाइस आणि 13 बॅटरी सेल सापडल्याचा दावा “कौटर टेररिझम डिपार्टमेंट’ने केला आहे.

शुक्रवारी सिबी शहराजवळ असलेल्या तांडोरी भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या बॉम्बच्या स्फोटामुळे पाच मजूर ठार आणि पाच जखमी झाले होते. तर शनिवारी ग्वादर जिल्ह्यातील गंज भागात दहशतवाद्यांनी एका वाहनावर हल्ला केल्याने पाकिस्तान नौदलाचे दोन जवान शहीद झाले आणि आणखी एक जखमी झाला होता. जानेवारीत, माच भागात दहशतवाद्यांनी हजारा समुदायाच्या 11 कोळसा खाण कामगारांचे अपहरण करून त्यांना गोळ्या घातल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.