पुणे – गुन्ह्याचा तपास इतर अधिकाऱ्याकडे असतानाही आरोपीला अटक करण्याची धमकी देत 50 हजार रुपये उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे.
अरविंद शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शिंदे डहाणूकर कॉलनी पोलीस चौकीत नियुक्तीस होते. घराच्या मालकी हक्कावरुन एरंडवणे भागातील अलंकार पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल आहेत. या गुन्ह्याचा तपास शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला नव्हता. मात्र, शिंदे यांनी या प्रकरणातील आरोपीला मोबाइलवर संदेश पाठवून पोलीस चौकीत बोलावून घेतले. आरोपीला अटक करण्याची भीती घालून शिंदे यांनी त्याच्याकडून 50 हजार रुपये घेतले.
या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांची चौकशी केली. चौकशीत तथ्य आढळल्याने शिंदे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी दिले.