पुणे – यु ट्यूब न्युज चॅनेल व संघटनेच्या नावाखाली हनी ट्रॅपचे जाळे रचत ब्लॅक मेलिंग करणाऱ्यांना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी एका संघटनेच्या प्रमुखास अटक केली असून संबंधीत यु ट्यूब न्यूज चॅनेलच्या चालकावरही गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आणखी दोघांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्यांच्याकडे सीबीआय अधिकारी असल्याची बनावट ओळखपत्रही सापडली आहेत. यामुळे प्रकरणात आणखीनच नवे वळण प्राप्त झाले आहे.
या प्रकरणी दिलीप मानसिंग मेमाणे(38,रा.जेजुरी,ता.पुरंदर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवप्रहार संघटनेच्या अनिल बोटे (रा.कोंढवा ) याला अटक केली आहे. तर महाराष्ट्राचा प्रहार न्यूजच्या राहूल हरपळेवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी दिलीप मेमाणे यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना ओळखीच्या स्वप्निल धोत्रेने फोन करुन पबला जाण्यासाठी बोलवले होते. त्यांच्यासोबत राहुल हरपळे व दोन मुलींना घेऊन ते कोरेगाव पार्क येथील पबला गेले. तेथे आरोपी अनिल बोटे हा अगोदरच दाखल झाला होता. क्लबमध्ये फिर्यादी मेमानेची यातील एका मुलीसोबत जवळीक झाली.
यानंतर त्यांनी एकमेकांना किसिंग केले. यानंतर घरी जाताना दोघांनी रस्त्यात पावभाजी खाल्ली. तेथे दोघांची जवळीक वाढल्याने दोघांनी मस्तानी लॉजवर जाऊन शरीरसंबंध ठेवले. यानंतर दोन दिवसांतच फिर्यादी मेमाणे याच्या भाजीच्या दुकानावर राहुल हरपळे, अनिल बोटे, स्वप्निल धोत्रे व त्यांच्या कार्यालयातील एक मुलगी दाखल झाली. यानंतर अनिल बोटे याने गाडीतून उतरुण तु संबंधीत मुलीवर बलात्कार केला आहेस, आम्ही तुझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार देणार आहोत.
जर तक्रार करायची नसेल तर पाच लाख रुपये आणून दे अशी मागणी केली. यानंतर दुसऱ्या दिवशी मेमाने अनिल बोटेला समजावण्यासाठी राहुल हरपळे याच्या हडपसर मेगा सेंटरमधील कार्यालयात गेला होता. तेव्हा पैसे न आणल्याने बोटेने मेमानेला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात व्हिल चेअर उचलून मारली. त्याला तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो व माझ्या संघटनेची काय ताकद आहे हे दाखवतो अशी धमकी दिली.
हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात यु ट्यूब व इतर संघटनांच्या नावाखाली बोगस पत्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्याकडून अनेकांना ब्लॅकमेलिंग केले जाते. यासंदर्भात कोणाच्या तक्रारी असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन हडपसर पोलिसांनी केले आहे.