पुणे – पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे दागिने चोरटा गजाआड झाला. बाजीराव रस्त्यावर ही घटना घडली. सचिन अशोक गायकवाड (वय ४२, रा. केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ महिला आणि त्यांची नात लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी आले होते. नूमवि शाळेसमोर बसथांब्यावर त्या दुपारी साडेचारच्या सुमारास थांबल्या होत्या.
बसमध्ये प्रवेश करत असताना चोरटा गायकवाडने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कापण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांनी गायकवाडला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे तपास करत आहेत.