पुणे- पूर्ववैमनस्यातून गणपती विसर्जनावेळी २०१६ मध्ये झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी पुणे कॅण्टोन्मेंटचे तत्कालीन उपाध्यक्ष व भाजपचा माजी नगरसेवक विवेक महादेव यादव याने कारागृहातून सुटलेल्या सराईतासह त्याच्या साथीदाराला विरोधक बबलू गवळी याच्या खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघा सुपारी किलरना अटक करून तीन गावठी पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि सुपारी स्वरूपात दिलेली १ लाख २० हजारांची रोकड व् जप्त केली आहे.
माजी नगरसेवक विवेक यादव असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापुर्वी पोलिसांनी राजन जॉन राजमनी (वय ३८, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (वय २७, रा. काळा खडक वाकड, पिंपरी-चिंचवड) यांना अटक केली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे पथकासोबत गस्तीवर होते. त्यावेळी येरवडा कारागृहातून बाहेर आलेला सराईत राजन जॉन राजमनी व त्याचा मित्र इब्राहिम शेख यांनी कोणाच्या तरी खुनाची सुपारी घेतल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुनील धिवार यांना मिळाली. आरोपी राजन राजमनी लुल्लानगर परिसरात दुचाकीवर फिरत असल्याचे समजले. त्यावेळी दोन पथके त्याचा शोध घेत होती. तो दुचाकीवर बसून कोणाची तरी वाट पाहताना पोलिसांना दिसला. दोघे निघून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी झडप घालून दोघांना पकडले.
चौकशीत दोघांनी राजन राजमनी व इब्राहिम शेख अशी नावे सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता, राजनजवळ दोन पिस्तुले, इब्राहीमकडे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे व गाडीच्या डिक्कीत १ लाख २० हजारांची रोकड मिळून आली. पिस्तुले व काडतुसे मिळून आल्यामुळे पोलिसांनी दोघांना ठाण्यात आणून चौकशी केली. चौकशीत त्यांनी विवेक यादव याच्याकडून एकाला मारण्याची सुपारी घेतल्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विवेक यादव याला अटक केली.