पुणे – अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शिवणे भागात घडली. याप्रकरणी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात अल्पवयीन मुलगा बचावला आहे.
याबाबत एका अल्पवयीन मुलाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मुलगा आणि त्याचा मित्र गुरुवारी ( 20 जानेवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास मित्राच्या वाढदिवसासाठी निघाले होते. वारजे भागातील रामनगर परिसरात दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मित्राला टोळक्याने अडवले. दोघांना शिविगाळ करून मारहाण केली.
टोळक्यातील एकाने त्याच्याकडील पिस्तुलातून अल्पवयीन मुलावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील रहिवासी जमा झाले. टोळक्यातील काहीजणांनी रहिवाशांना धमकावले. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक पी. एम. वाघमारे तपास करत आहेत.