पुणे – भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना हडपसर भागात शेवाळवाडी परिसरात घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेला युवक अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत होता.
नीरज पंकज धाराशिवकर (वय 21, रा. हडपसर) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल उदावंत (वय 36, रा. हडपसर) यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उदावंत यांचा चुलत भाऊ, पुतणी तसेच भाचा नीरज दुचाकीवरून शेवाळवाडीतील बाजारात गुरुवारी ( 20 जानेवारी) दुपारी बाराच्या सुमारास भाजी खरेदीसाठी निघाले होते.
भारत पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकीस्वार नीरज गंभीर जखमी झाला. त्याच्याबरोबर असलेले सहप्रवासी नातेवाईक किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या नीरजचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.