पुणे – कोंढवा भागात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन किलो 832 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. नजामुद्दीन शहाबुद्दीन खान (वय 36, रा. भागोदयनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
खान कोंढवा भागात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून खानला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली.
पिशवीत गांजा सापडला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 56 हजार 640 रुपये आहे. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, विशाल दळवी, संदीप जाधव, रेहाना शेख यांनी ही कारवाई केली.