पुणे – दुकानदाराने पैसे दिले नाही म्हणून दुकानाची तोडफोड करून मध्यस्थीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. विनोद बालाजी सोमवंशी (वय-२०, दत्तनगर, कात्रज), गोविंद बबन लोखंडे (वय १८, शनीनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद सोमवंशी याच्या सांगण्यावरून भूषण भांडवलदार, जावेद शेख यांनी ५ ऑक्टोबर रोजी गणेश सुपर मार्केट चालकास पैशाची मागणी करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी फिर्यादी हे मध्यस्थीसाठी आले होते. यावेळी विनोद सोमवंशी आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी आणि साक्षीदारांना मारहाण करून फिर्यादी यांच्या मुलाला तू आता गेलास, तुला खल्लासच करणार, असे म्हणून डोक्यावर मारहाण करून जखमी केले.
तसेच फिर्यादी यांच्या पुतण्याला व मेहुण्याला मारहाण केली. फिर्यादी यांच्या घराच्या दरवाज्यावर लाथाबुक्क्या मारल्या, तोडफोड करून पसार झाले होते.
गुन्हा केल्यापासून मुख्य आरोपी विनोद सोमवंशी हा सारखा पत्ता बदलत होता. पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना आरोपी विनोद सोमवंशी आणि गोविंद लोखंडे हे कात्रज कोंढवा रोडवरील दांडियाच्या कार्यक्रमात आले असल्याची माहिती मिळाली होती. छापा टाकून दोघांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरिश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धीरज गुप्ता, मोहन कळमकर, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांच्या पथकाने केली.