Hardik Pandya Injury Update : भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला गोलंदाजी करत असताना उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला गोलंदाजी करणे शक्य झाले नाही तसेच मैदानही सोडावे लागले होते.
हार्दिकच्या घोट्याचे स्कॅनिंग करण्यात आल्यानंतर ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, स्पर्धेचे महत्त्व पाहता त्याला येत्या रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाणार आहे. त्यानंतर तो 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संघात पुनरागमन करेल, असे बीसीसीआयने सांगितले आहे.
कशी झाली दुखापत…
वास्तविक, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान नवव्या षटकात हार्दिकने लिटन दासने मारलेला फटका उजव्या पायाने रोखण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो चुकीच्या पद्धतीने डाव्या पायावर पडला. काही वेळातच फिजिओला मैदानावर बोलावण्यात आले.
फिजिओने हार्दिकच्या डाव्या पायावर पट्टी लावली आणि पेन किलर स्प्रेही लावला, पण आराम मिळाला नाही. हार्दिकने उठून पुन्हा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण तो करू शकला नाही. अशा परिस्थितीत कोणताही विलंब न करता आणि कोणतीही जोखीम न घेता रोहितने हार्दिकला फिजिओसोबत मैदानाबाहेर पाठवले. तोपर्यंत हार्दिकने पहिल्या षटकातील तीन चेंडू टाकले होते. उर्वरित तीन चेंडू विराट कोहलीने टाकले. त्याने सहा वर्षांनंतर वनडेत गोलंदाजी केली. कोहलीने या तीन चेंडूत केवळ 2 धावाच दिल्या. चौथ्या चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर प्रत्येकी एक धाव आली.
हार्दिकच्या जागी कोणाला मिळणार संधी…
जर हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्ध खेळला नाही तर शार्दुलला विश्रांती दिली जाऊ शकते आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला खेळवले जाऊ शकते, कारण धर्मशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. त्याचवेळी हार्दिकच्या जागी स्पेशालिस्ट फलंदाज म्हणजेच सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते.
विश्वचषक 2023 मध्ये हार्दिकची कामगिरी..
30 वर्षीय हार्दिकच्या या विश्वचषकात आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने चार सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 6.84 राहिला आहे. 34 धावांत 2 बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एकदाच फलंदाजीची संधी मिळाली. त्या सामन्यात तो 11 धावा करून नाबाद राहिला. हार्दिकच्या एकूण एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, हार्दिकने 86 एकदिवसीय सामन्यांमध्ये 84 बळी घेतले आहेत. तसेच 11 अर्धशतकांच्या मदतीने 1769 धावा केल्या आहेत.