पुणे – पादचारी महिलांना टार्गेट करून त्यांच्याकडील मौल्यवान ऐवज लांबविणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याची चेन, दागिने, रोकड यासह चोरीची दुचाकी असा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माधुसिंह भँवरसिंह भाटी (२२), प्रमोद जगदीश गौड (२७, दोघे. रा. कोंढवा, मूळ. रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शुक्रवार पेठेतील पाटसकर रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. खडक पोलिसांकडून याचा तपास सुरू होता. या दरम्यान गुन्ह्यातील आरोपी हे सेव्हन लव्हज चौकातील अजंठा वाईन येथे थांबल्याची माहिती पथकाला मिळाली.
यानूसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपींनी कर्वेनगर येथे पादचारी महिलेकडील बॅग चोरल्याचे समोर आले. यानूसार पोलिसांनी आरोपींकडून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली चोरीची दुचाकी असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी रवी लोखंडे, सागर घाडगे, संदीप तळेकर, मंगेश गायकवाड यांच्या पथकाने केली.