हडपसर – कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून राज्यातील प्रत्येक पात्र नागरीकाला लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे.
पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे, असे सांगतानाच पुणे शहरातील हडपसर परिसरात सुरू करण्यात आलेले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.
हडपसर येथील महापालिकेच्या विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह येथे पहिल्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले.
त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार वंदना चव्हाण (व्हीसीद्वारे), खासदार डॉ.अमोल कोल्हे (व्हीसीद्वारे), तसेच प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी आमदार चेतन तुपे, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल , सर्व नगरसेवक व नगरसेविका आदी उपस्थित होत.
पुणे शहरातील हडपसर येथे सुरू करण्यात आलेले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरच्या माध्यमातून जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे सामना करतो आहोत, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत कोणत्याही परिस्थिती बेसावध राहून चालणार नाही.
राज्य शासनानेही तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत बालरोग तज्ज्ञांचाही टास्क फोर्स तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोना सोबत इतर संगर्सजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबतही दक्ष राहण्याच्या सूचना देत आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आमदार चेतन तुपे म्हणाले, पुणे शहरातील ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सेवा देण्यास महत्वप ठरेल. महानगरपालिकेच्या मोठया शाळेमध्ये अशा पद्धतीने सोय केली तर लसीकरणात सुलभता येईल. ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरच्या माध्यमातून लसीकरणात दर्जेदार सेवा देण्यावर भर असेल.