पुणे – महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू तसेच इतर काही साथरोगांचा प्रादूर्भाव वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून पुणे शहरासाठी आता स्वतंत्र कमांड अॅंड कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे आणि नागपूर या शहरांसाठी ही केंद्र स्थापन केली जाणार असून, त्यासाठीचा सर्व निधी केंद्राकडून दिला जाणार आहे.
बाणेर येथील महापालिकेच्या नवीन रुग्णालयात हे सेंटर उभारण्याचे काम सुरू आहे. शहरातील शासकीय तसेच खासगी रूग्णालयात दाखल होणार्या दैनंदिन रूग्णांच्या माहितीचे संकलन तसेच विश्लेषण करून त्यानुसार, आरोग्य व्यवस्थेसाठीच्या उपाय योजनांचे काम या सेंटरच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डाॅ. भगवान पवार यांनी दिली. करोना साथीनंतर मोठ्या शहरांमध्ये साथरोगांबाबत उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन भविष्यात अशा वेळी नियोजन करण्याच्या अनुषंगाने केंद्राकडून ही सेंटर उभारली जात आहेत.
मोठया शहरांमधे दैनंदिन उपचारसाठी येणार्या नागरिकांची संख्या मोठया प्रमाणात असते. मात्र, त्याची दैनंदिन माहिती संकलित करण्यात येत नाही. त्याची नोंदही आरोग्य विभागाकडे ठेवली जात नाही. त्यामुळे एखाद्या साथीचा उद्रेक झाल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ होते. त्यानंतर माहिती संकलित करून त्यानुसार उपाय योजना केल्या जातात. तोपर्यंत मोठी हानी झालेली असते.
ही बाब लक्षात घेउन या सेंटरच्या माध्यमातून आता खासगी तसेच शासकीय रूग्णालयातील रूग्णांची दैनंदिन माहिती संकलित करून दररोज या माहितीचे विश्लेषण केले जाणार आहे. परिणामी, एखाद्या आजाराचे रूग्ण कोणत्या भागात, किती प्रमाणात, कोणत्या कालावधीत सापडतात याचे विश्लेषण करून त्या माहितीच्या आधारे साथ प्रतिबंधात्मक धोरणे तयार करणे तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे सोपे होणार आहे.
“दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी केंद्र शासनाकडून हे सेंटर उभारले जाणार आहे. महापालिकेकडून त्यासाठी बाणेर हाॅस्पिटल येथे सुविधा उभारली जाईल. या केंद्राच्या माध्यमातून दैनंदिन माहितीच्या संकलन करून त्या आधारे साथरोग नियंत्रणासाठी उपाय योजना करण्यात येणार आहेत.” – डाॅ. भगवान पवार, आरोग्य विभागप्रमुख, मनपा