पैशांअभावी रुग्णांवर उपचार टाळू नका : डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश
पुणे – काही खासगी धर्मादाय रुग्णालये पैशांअभावी गरीब रुग्णांवर उपचार करण्यास नकार देतात. या पार्श्वभूमीवर या रुग्णालय प्रशासनांची जिल्हाधिकारी कार्यालयात धर्मादाय बैठक झाली. यावेळी “गरीब रुग्णांना नाकारू नका, त्यांच्यावर उपचार करा,’ असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी रुग्णालयांना दिले.
बैठकीला आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, राहुल कुल आणि अशोक पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम हेदेखील उपस्थित होते. धर्मादाय रुग्णालयांना शासनाकडून विविध सवलती दिल्या जातात.
काही रुग्णालयांना शासनाने नाममात्र दराने जागा दिल्या. या बदल्यात रुग्णालयांनी काही टक्के बेड हे गरिबांसाठी राखीव ठेवणे आवश्यक असते. तसेच खासगी रुग्णालयांच्या एकूण उत्पन्नातून दोन टक्के रक्कम राखीव ठेवण्यात येते. मात्र, याचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
वचक बसणार का?
रुग्णालय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील 15 दिवसांनी पुन्हा बोलविले आहे. किती गरीब रुग्णांवर उपचार केले, याची माहितीही मागविण्यात आली आहे. शिवाय, निर्धन निधी कसा खर्च होतो, त्याचा ताळेबंद रुग्णालयाने दर महिन्याला द्यावा. याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला बैठक घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या. त्यामुळे या धर्मादाय रुग्णालयांवर काही प्रमाणात वचक बसणार आहे.