14 ठिकाणी धोका : महापालिकेचे सर्वेक्षण
आता पादचारी मार्ग आणि पूल उभारणार
पुणे – तब्बल हजार कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एनडीए चौकात (चांदणी चौक) पूल उभारला. पण, तो पादचाऱ्यांसाठी एक- दोन नाही, तर तब्बल 14 ठिकाणी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. चौकात पादचाऱ्यांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने अपघात होत आहेत. शिवाय, तक्रारी वाढल्या आहेत.
आता महापालिकेने या चौकात सर्वेक्षण केले. त्यानुसार पदपथ, पादचारी उड्डाणपूल तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा आराखडा तयार केला आहे. आराखडा अंतिम करून तो अंदाज समितीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक सल्लागार निखील मिजार यांनी दिली.
4 कि.मी. पदपथ आणि 1 पूल
या चौकात पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडणे, चारही दिशांना सुरक्षित जाण्यासाठी सुमारे 4 किलोमीटरचे पदपथ करण्याची आवश्यकता आहे. रस्ता ओलांडण्यासाठी एक पूल प्रस्तावित केला जाणार आहे. तो सर्व रस्त्यांवरून येणाऱ्या पदपथांना जोडला जाणार आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार जिने तयार केले जाणार आहेत. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावून नागरिकांना सुरक्षित रस्ता ओलांडता येईल, यासाठी उपाययोजना करण्यात येतील. पादचारी पूल या चौकात प्रस्तावित असलेली शिवसृष्टी तसेच “बस-बे’ला जोडलेला आहे.
या आहेत काही प्रमुख अडचणी
* मुंबईकडील महार्मागावर वेदभवनापुढेच रस्त्यावर बस थांबणे.
* कोथरूडकडील रस्त्याकडेने संपूर्ण रस्त्यावर पदपथ नसणे.
* मुंबईकडून येणाऱ्या बस कोथरूडकडे रस्त्याकडेला थांबणे
* बावधनकडून कोथरूड आणि महामार्ग बाजूला पदपथ नसणे
* बावधन सर्कल, एनडीए शिल्प चौकात पादचारी मार्ग नसणे
* कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्याकडेलाच रिक्षांचा अनधिकृत थांबा
* मुंबईकडे जाणाऱ्या बसेस महामार्गावर तीन ठिकाणी थांबणे
* मुळशीचे सर्व रस्ते एकत्रित येतात. तेथे पादचारी मार्ग नसणे
* पीपीआयटी जंक्शन येथे धोकादायक रस्ता ओलांडणे