पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये इयत्ता दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३१ जानेवारीपासून ऑनलाइन प्रवेशपत्र शाळेकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
इयत्ता दहावीच्या सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांनी शिक्का देत आणि स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील, तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्याथ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील्र दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्याथ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणा-या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी सर्व् बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करण्यात येणार आहे, अशा सूचना राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी जारी केलेल्या आहे.