पुणे : महापालिकेकडून जी 20 परिषदेसाठी सेनापती बापट रस्त्याचा कायापालट करण्यात आला आहे. या रस्त्यावरील चौकांच्या सुशोभिकरणासह, सायकल ट्रॅक आणि इतर पादचाऱ्यांनी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा करण्यात आलेल्या आहेत. मात्र, हे काम करताना एका ठिकाणी महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी असलेल्या अभियंत्यानी करून दाखविलेल्या एका “रेज्ड क्रॉसिंग’ चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
रत्ना हॉस्पीटलच्या बाहेर पडण्याच्या गेटसमोर हा क्रॉसिंग तयार करण्यात आला असून धक्कादायक बाब म्हणजे हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता दुभाजकच काढलेला नाही. त्यामुळे, या क्रॉसिंग ऐवजी नागरिक भर रस्त्यातून जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडत आहेत. जवळपास आठवडयाभरापूर्वी हा क्रॉसिंग तयार करण्यात आलेला आहे.
काय आहे ” रेज्ड क्रॉसिंग’
सर्वसाधारणपणे मुख्य चौकात आणि वर्दळीच्या चौकांमध्ये मुख्य रस्त्यावर दोन चौकात 250 मीटर पर्यंतच्या अंतरात हे क्रॉसिंग बसविले जातात. विशेशत: शाळा, दवाखाने, अथवा बाजारपेठेचा रस्ता असलेल्या भागात हे क्रॉसिंग बसवितात. जी20 परिषदेसाठी शहरातील रस्त्याचे सुशोभिकरण केले जात असल्याने महापालिकेने सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पीटलच्या समोर हे क्रॉसिंग बसविले आहे.
चौकात असलेले इतर क्रॉसिंग हे रस्त्याच्या समपातळीत असतात तसेच त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे असतात. तर रेज्ड क्रॉसिंग रस्ताच्या दोन्ही बाजूंना जोडणारे तसेच पदपथाच्या उंची एवढे असतात. तसेच सुमारे अडीच मीटर रूंद असतात. त्यामुळे ते स्पीड ब्रेकरसारखे इतराचे तसेच मध्यभागी सहज पादचाऱ्यांना चालता येईल असे असतात, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पदपथांना हे क्रॉसिंग असल्याने ते सरळ असते त्यामुळे, रस्ता दुभाजकही काढणे आवश्यक असते.
“आज सकाळी सेनापती बापट रस्त्याच्या पाहणीत ही बाब निदर्शनास आली आहे. त्यानुसार, क्रॉसिंगचे काम करणाऱ्या ठेकेदारास तातडीनं दुभाजक काढण्याचे आदेश दिले आहेत.
– दिनकर गोजारे ( कार्यकारी अभियंता , पथ विभाग )
मात्र, रत्ना हॉस्पीटल समोर हा क्रॉसिंग तयार करून त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून तो पूर्ण तयार करून झालेला असून दुभाजक न काढताच तो तसाच सोडून देण्यात आला आहे. त्यामुळे, नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही, त्यामुळे नागरिक या ठिकाणी असलेल्या जुन्या क्रॉसिंगसाठी फोडलेल्या दुभाजकाचा वापर करत असून या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे.