पुणे (प्रतिनिधी) – गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड करोनाच्या संसर्गामुळे शुक्रवारपासून बंद ठेवण्यात आल्यानंतर बाजार समितीच्या उपबाजारात भाजीपाल्याच्या ३०१ गाड्यांची आवक झाली. शुक्रवारी मोशी येथील उपबाजारात २७५ भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक झाली.खडकी येथील उपबाजारात २० गाड्या आणि उत्तमनगर येथील बाजारात ६ गाड्यांची आवक झाली.
शुक्रवारी उपबाजारात एकूण मिळून ४ हजार ४०० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली.सोलापूर रस्त्यावरील मांजरी येथील उपबाजारात होणाºया गर्दीमुळे तेथील कामकाज सध्या बंद आहे.शहरात भाजीपाल्याची नियमित आवक सुरू राहणार असून बाजार समितीकडून आवक नियमित सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.
मार्केटयार्डातील भाजीपाला बाजारात काम करणारे बहुतांश आडते, कामगार, हमाल करोनाबाधित भागातील आहे. त्या भागात करोनाबाधित रू ग्ण सापडले. त्यामुळे बाजार समितीने बाजारआवारात प्रवेश करणाऱ्या बाजारघटकांना काही सूचना दिल्या.भाजीपाला बाजारात तुलनेत गर्दी जास्त असते. तेथे संसर्ग होण्याची शक्यता असल्याने बाजारघटकांनी अशा परिस्थितीत काम करणे उचित ठरणार नाही, अशी विनंती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली होती.
बाजारसमिती, आडते, कामगारांची बैठक गुरुवारी (९ एप्रिल) पार पडली.त्यानंतर मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग तसेच फळ विभाग अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला. मार्केटयार्डातील फूल बाजारातील कामकाज १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय फूल बाजारातील आडते संघटनेने घेतला आहे.