जामखेड: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार दि १० ते १४ एप्रिलपर्यंत जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून घोषित करण्यात आले असून जामखेड शहरापासून २ किमी चा परिसर हा कोअर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जामखेड शहरातील अंर्तगत रस्ते सील करून बंद करण्यात आले असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जामखेड शहरासह नगर मुकूंदनगर (अहमदनगर शहर), आलमगीर (अहमदनगर तालुका) नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), हे चार क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याअनुषंगाने जामखेड शहर येत्या १४ एप्रिल पर्यंत पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात येत असून शहराच्या मध्यबिंदु पासुन जवळपास २ कि. मी. चा परिसर हा कोअर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून या क्षेत्रातील किराणा ,मेडिकल ,दवाखाने ,सर्व आस्थापना, अत्यावश्यक सेवा १४ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांना कुठेही बाहेर ,किंवा शहरात प्रवेश बंदी करण्यात आली असून तसेच या क्षेत्रातून वाहनांची ये-जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणाऱ्या दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात याव्यात. त्याकामी जीवनावश्यक वस्तुंचे व्हेंडर पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे, असे या आदेशात देण्यात आले असतानाही सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत अत्यावश्यक घरपोच मिळण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयातून शहरासाठी सेवानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली असतानाही नागरिकांना पहिलाच दिवशी कोणतेही अत्यावश्यक सामान मिळाले नाही. नागरिकांचे हाल झाले. तहसील कार्यालयाने प्रसिंद्ध केलेल्या नंबरवर नागरिकांनी फोन लावूनही कोणत्याच प्रकारची दाद न दिली जात नाही तसेच संबंधित अधिकार्यांच्या फोनवर नागरीकांनी फोन केला तर ते उचलत नाही त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.