पुणे – भिडेवाडा राष्ट्रीय स्मारका उभारण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. स्मारकासाठी पाच आराखडे दाखल झाले असून त्याचे सादरीकरण सुरू आहे. यासह गंज पेठेतील महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणाचा आढावा घेण्यासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात आढावा बैठक बोलाविली आहे.
राज्यशासनाने या स्मारकासाठी ५० कोटी रूपयांची तरतूद केलेली आहे. महापालिकेने २००६ मध्ये या जागेत स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर जागा मालकांनी विरोध केल्याने जवळपास १३ वर्षे न्यायालयात लढा सुरू होता. दोन महिन्यांपूर्वीच या प्रकरणात पालिकेच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला. या विरोधात जागामालक व भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने पहिल्याच सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली. तसेच ही जागा २ डिसेंबर पर्यंत ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेने ४ डिसेंबर रोजी या जागेचा ताबा घेतला आहे.