पुणे – प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात “नेट’च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ती 6 ते 8 ऑक्टोबर, तर 17 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) देशभरात “नेट’ची परीक्षा घेतली जाते. यापूर्वी 6 ते 11 ऑक्टोबरदरम्यान ही परीक्षा होणार होती. मात्र याच कालावधीत अन्य काही प्रमुख परीक्षा होणार आहेत. त्यामुळे या परीक्षांच्या तारखेत बदल करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत होती. याचा विचार करून एनटीएने परीक्षाच्या तारखांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, दि. 10 ऑक्टोबरला केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा होत आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावे लागले आहे. आता पहिल्या टप्प्यात 6 ते 8 ऑक्टोबर रोजी नेटची परीक्षा होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दि. 17 ते 19 ऑक्टोबर यादरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचे “एनटीए’ने स्पष्ट केले आहे. तथापि, नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपली. तर अर्ज भरल्यानंतर शुल्क भरण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबरपर्यंत आहे.