पुणे – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक फर्गसन रस्ता, एम.जी रस्ता, कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. तर, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची शिवाजी रस्ता परिसरात गर्दी होते. या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून आणि 1 डिसेंबर रोजी सकाळपर्यंत शिवाजी रस्त्यावर परिस्थितीनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश दिले.
या ठिकाणी नो व्हेईकल झोन
31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 1 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत फर्गसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, एम.जी. रस्त्यावर नो व्हेइकल झोन असेल. गुडलक चौक ते फर्गसन कॉलेज मेनगेटपर्यंत. झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक. हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक (पुलगेट चौकी) पर्यंत
असा असेल कॅम्प परिसरात बदल
*वाय जंक्शनवरुन एम.जी रोडकडे येणारी वाहतूक ही 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशिद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
*इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
*व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात येईल.
*इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळवण्यात येईल.
*सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक ताबूत स्ट्रीटरोडमार्गे पुढे सोडण्यात येईल.
शिवाजी रस्त्यावर असा असेल बदल
*1 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत शिवाजी रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शिवाजी रस्त्यावरील चारचाकी वाहने आणि सर्व प्रकारच्या बसेस वाहतुकीस बंदी करण्यात येणार आहे.
*पुरम चौकातून बाजीराव रोडवरुन शिवाजीनगरकडे जाणा-या वाहने पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक आणि पुढे एफ सी रोडने इच्छितस्थळी जातील.
*शिवाजीरोडवरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडमार्गे खंडोजी बाबा चौक-टिळक चौक- टिळक रोडने इच्छितस्थळी जावे.
*स.गो. बर्वे चौकातून पुणे महानगरपालिका भवनकडे जाणारी वाहतूक स. गो. बर्वे चौक-जंगली महाराज रोड मार्ग- झाशी राणी चौक येथून डावीकडे वळून म.न.पा. भवनकडे जातील.
*अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून वाहतूक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.