पुणे –आमदार मुक्ता टिळक यांच्या निधीतून संपूर्ण कसबा मतदारसंघातील पोलीस ठाणे, पोलीस चौकी आणि परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले. सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. एकूण दीड कोटी रुपये निधीतून 80 कॅमेरे बसवले आहेत.
यावेळी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, फरासखानाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या राजेंद्र काकडे, छगन बुलाखे ऍड. राणी सोनवणे, अश्विनी पांडे, अमित कंक, नगरसेविका गायत्री खडके, सम्राट थोरात आदी उपस्थित होते.
“गर्दी, वाईट प्रवृत्तीचे लोक, वाहतूक कोंडीवर हे कॅमेरे तिसरा डोळा म्हणून काम करतील. पोलिसांचे जवळपास असणे आपल्यात सुरक्षित असल्याची भावना निर्माण करते. हे कॅमेरे सुद्धा तीच भूमिका बजावतील,’ असे टिळक म्हणाल्या. “आमदार टिळक या वेळोवेळी आमच्या मदतीसाठी धावून येतात. पोलीस हे गणवेशातील नागरिक आहेत. या कॅमेरांमुळे अनेक समाजविघातक शक्तींना आळा बसू शकतो. आपल्यावर पोलिसांची नजर आहे, ही भावना सुरक्षित करणारी असते,’ असे शिसवे म्हणाले.