पुणे – खासगी व्यक्तीमार्फत पाच हजाराची लाच स्विकारताना महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकास ताब्यात घेण्यात आले. लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा येथे ही कारवाई केली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल भगवान कोठावळे(32) असे आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे. त्याने खासगी व्यक्ती प्रकाश दौलत वाघचवरे(56) याच्या मार्फत लाच स्विकारली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार यांचा वैयक्तीक टेम्पो असून ते येरवडा भागात कचरा उचलतात व कचरा डेपो येथे कचरा टाकतात. कचरा उचलून येरवडा कचरा डेपो येथे टाकण्यासाठी व टेम्पोचे काम सुरु ठेवण्यासाठी कोठावडे यांनी दरमहा पाच हजाराची लाच मागितली होती.
ही लाच आज खासगी व्यक्ती वाघचवरे याच्यामार्फत स्विकारल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अक्षिक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.