पुणे – वर्षभर पडणारा पाऊस, चक्रीवादळ अशा हवामानविषयक परिस्थितीमुळे यंदा पक्ष्यांवर अधिक परिणाम झाला आहे. गेल्या वर्षभरात पुणे आणि परिसरात तब्बल 741 पक्ष्यांना याचा फटका बसला आहे. यामध्ये मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांचादेखील समावेश आहे.
शहरातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टने 2019-2020 मधील बचाव आणि मदत कार्याचा अहवाल प्रकाशित केला. संस्थेने या वर्षात पूर्ण राज्यातील 8,593 प्राणी-पक्ष्यांना मदत पुरविली असून, यामध्ये प्राणी-पक्ष्यांची सुटका, त्यांचा बचाव आणि उपचार अशा विविध कामांचा समावेश आहे. यामध्ये घरगुती प्रकारातील 7,502 तर, वन्यजीव प्रकारातील 1,091 प्राण्यांचा समावेश आहे. यामध्ये 741 पक्ष्यांचादेखील समावेश आहे.
संस्थेच्या संस्थापिका नेहा पंचमिया म्हणाल्या, “लॉकडाऊनमुळे एकीकडे कामाबाबत बऱ्याच मर्यादा आल्या होत्या. मात्र, त्याचवेळी वन्यजीवांच्या मदतीसाठी सातत्याने येणारी साद खुणावत होती. अशा स्थितीत निधीची समस्या असूनही संस्थेने त्यांचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे आणि तत्परतेने केले.
याकाळात संस्थेकडे धोकादायक परिस्थितीत असलेल्या पक्ष्यांना मदतीसाठी बरेच कॉल्स आले. संस्थेने अपघाती तसेच तस्करी केले जाणारे पक्षी अशा विविध प्रकारच्या घटनांमध्ये हे मदतकार्य केले आहे.’