पुणे : भाजप नेते खासदार गिरीष बापट यांचे आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यातच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी “गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मला मनाला विश्वास वाटत होता की आजारी असतानाही त्यांच्याबद्दलच्या बातम्या चुकीच्या ठरतील. पण दुर्दैवाने त्या बातम्या खऱ्या ठरल्या. पुण्याच्या राजकारणाचं, समाजकारणाचं, पुणे-महाराष्ट्र भाजपाचं हे फार मोठं नुकसान आहे. विरोधी पक्षांना सोबत घेऊन कसं काम करायचं यामध्ये त्यांचं कौशल्य होतं. एखादी समस्या कशी सोडवायची, याचं त्यांचं वेगळं कसब होतं. ते सर्वांचे मित्र होते. कुणाशीही शत्रुत्व नाही. हे सगळं एका माणसामध्ये आयुष्यभर मेहनत घेऊन निर्माण होतं” असे म्हणत बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गिरीश बापट यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.