Pune Bar Association Election – वकीलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी प्रमुख निवडणूक आयुक्त म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ वकील एन. डी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. केतन कोठावळे व मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. दादाभाऊ शेटे यांनी शुक्रवारी (दि. 3) दिले.
पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणुक 31 जानेवारी रोजी होणार होती. मात्र, मतदार यादीतील त्रृटींवर वकीलवर्गाकडून आक्षेप घेण्यात आला. तसेच, वकीलवर्गांमध्ये विविध मतप्रवाह निर्माण झाल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. बारच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत गैरकारभारांना आळा बसावा तसेच निवडणुकीत पारदर्शकता आणण्याची मागणी वकील वर्गाकडून करण्यात येत होती.
त्यापार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे. प्रमुख निवडणूक आयुक्तांच्या देखरेखीखाली 3 फेब्रुवारी रोजी मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. त्यानंतर 8 फेब्रुवारीपर्यंत आलेल्या हरकतींवर कार्यवाही करून 12 फेब्रुवारी रोजी अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. त्यानंतर, 16 फेब्रुवारी रोजी मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडेल, असे पाटील यांनी नमूद केले.