पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी मंगळवारी (दि.13) दुपारी तीनपर्यंत पुणे बंदची हाक दिली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये शहरातील विविध संघटना आणि मान्यवर व्यक्ती यांनी पाठिंबा दिला असून मोर्चामध्येही सहभागी होणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने खासदार उदयनराजे भोसले, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, पुणे शहर व्यापारी संघटना, आडते असोसिएशन, मराठा क्रांती मोर्चा, मुस्लीम संघटना, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, एमआयएम, जनता दल, वंचित बहुजन आघाडी, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, तालीम संघ, माथाडी कामगार संघ, रिक्षा संघटना, क्रीडा संघटना, कामगार युनियन आदींसह विविध व्यक्ती आणि संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत.
मोर्चाचे आयोजन
मंगळवारी सकाळी दहा वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर हा मोर्चा खंडोजीबाबा चौक-टिळक चौक-लक्ष्मी रोडने बेलबाग चौक येथून लाल महाल येथे जाणार आहे. त्यानंतर लाल महाल येथे सभेने समारोप होणार आहे.