लोणी काळभोर – संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होताना दिसत आहे. परस्परविरोधी दोन्ही पॅनेलच्या जोरदार प्रचारामुळे निवडणूक रंगतदार अवस्थेत पोचली आहे. 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जनतेतून सरपंच निवड होणार असून, यापूर्वी 2017 साली झालेल्या निवडणुकीत मावळत्या सरपंच गौरी गायकवाड जनतेतून निवडून आल्या होत्या. यावेळी सरपंचपदासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण आहे.
यासाठी सत्ताधारी नवपरिवर्तन पॅनलचे प्रमुख चित्तरंजन गायकवाड व विरोधी जनसेवा पॅनेलच्या उमेदवार कल्पना काळभोर या दोन प्रमुख उमेदवारांत थेट लढत होणार आहे. सरपंचपदाच्या लढतीत दोन्ही उमेदवार प्रबळ असल्याने, निवडणुक चुरशीची झाली आहे. सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व त्यांचे पती,
भाजपच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजण त्रिंबक गायकवाड यांनी सर्वोतोपरी प्रयत्न चालवले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी सरपंच नंदु पाटील काळभोर, मावळते उपसरपंच बाबासाहेब काळभोर व पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रविण काळभोर व सहकाऱ्यांनी कंबर कसली आहे.
झेडपीची लिटमस टेस्ट
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकी नंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आगामी काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीची लिटमस टेस्ट समजली जात आहे. लोणी काळभोर – कदमवाकवस्ती मिळून एक जिल्हा परिषदेचा गट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेडपी निवडणुकीचे अंदाज, आडाखे, ठोकताळ्यांचे गणित मांडून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे.