पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाचे शुल्क थकवल्याची बाब समोर आली आहे. संबंधित स्वायत्त महाविद्यालयांनी शुल्क न भरल्यास आता त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला. यावरुन विद्यापीठाचा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न थकल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाला परीक्षा शुल्क, संलग्नता शुल्क आणि इतर शुल्क त्वरित देणे अनिवार्य आहे. मात्र या महाविद्यालयांनी विद्यापीठाचे शुल्क थकवल्याचे नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतून पुढे आली. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांनी स्वायत्ततेच्या धोरणाअंतर्गत स्वायत्त दर्जा प्राप्त केला आहे. स्वायत्त होणाऱ्या महाविद्यालयांची संख्या सातत्याने वाढत आहे.
स्वायत्ततेअंतर्गत महाविद्यालयांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळते. त्यानुसार परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेणे, नवे अभ्यासक्रम तयार करून राबवण्याची मुभा मिळते. मात्र, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर विद्यापीठाचेही बोधचिन्ह असते. त्यामुळे स्वायत्त दर्जा मिळाल्यानंतर संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठाला शुल्क देण्याचा नियम आहे. मात्र स्वायत्त दर्जा मिळाल्यानंतर अनेक महाविद्यालयांनी शुल्काची रक्कम विद्यापीठाकडे जमा केले नसल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठकीत स्वायत्त महाविद्यालयांकडून थकवलेल्या शुल्काबाबत चर्चा करण्यात आली. शुल्क थकवलेल्या महाविद्यालयांना सुरुवातीला नोटीस बजावण्याचा, त्यानंतरही शुल्क न भरल्यास विद्यापीठाचे नाव, बोधचिन्ह वापरण्यास बंदी घालण्यासह कठोर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे आता स्वायत्त महाविद्यालयांना शुल्क भरणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाइ होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
विद्यापीठ कारवाई करणार का?
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने स्वायत्त महाविद्यालयांवर कारवाइ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्वायत्त महाविद्यालयांकडून प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर प्रत्यक्षात विद्यापीठ अशा महाविद्यालयांवर कारवाइचा बडगा उगारेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.