पुणे – पालिकेच्या प्रॉपर्टी टॅंक्सच्या धर्तीवरच आता जमीनविषयक महसूल कर अर्थात शेतसारा ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. भूमि अभिलेख विभागाने याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात सुमारे १,९०० गावे आहेत. यातील सुमारे १,५०० गावांमध्ये तलाठी स्तरावरून ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता पुढील टप्प्यात लवकरच या गावांमध्ये शेतसारा भरण्याची ऑनलाइन नोटीस बजावली जाणार असून शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाइन कर भरता येणार आहे.
शेतसारा वसुलीसाठी तलाठ्यांना खातेदारांच्या घरोघरी फिरावे लागत होते. तसेच या कराची वसुली वेळेवर होत नव्हती. तसेच कर किती थकीत यांची सुद्धा माहिती खातेदारांना नसते, या पार्श्वभूमीवर भूमि अभिलेख विभागाने संगणक प्रणाली विकसित केली आहे. या सुविधेमुळे सर्व्हे नंबर निहाय अथवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसाऱ्याची रक्कम किती होत आहे. थकीत कर किती आहे, याची माहिती संगणकावर मिळणार आहे.
भूमि अभिलेख विभागाने ई चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे. https://echawadicitizen.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर शेतसारा भरता येणार आहे. शेतीचा कर भरण्याबरोबरच बिनशेती कर अर्थात एनए कर सुद्धा भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील उर्वरित ४०० गावांमध्ये तलाठी स्तरावरून कर भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होईल, त्यादृष्टीने काम सुरू आहे.
इंग्रजांपासून शेतसारा वसुली
शेतसारा हा पारंपरिक कर आहे. इंग्रजांच्या काळापासून जमिनींवर कर लावण्यास सुरुवात झाली. पूर्वी शेतसारा हा महसूल देणारा महत्त्वाचा कर होता. कालातरानंतर जशी प्रगती होत गेली. तसे नव-नवे कराची आकारणी सुरू झाली. मात्र, जमिनींवर आकारला जाणाऱ्या या कराची वसुली आजही सुरू आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी होते.
…म्हणून वसुलीत अडचणी
शेतीचा कर हा अल्प असल्याने या कराची वसुली अपेक्षित एवढी होत नाही. थकबाकीची रक्कम मोठी झाल्यावर हा कर वाढलेला दिसतो. थकबाकीची रक्कम ही तलाठी कार्यालयात गेल्यावरच कळते. तसेच आता घरबसल्या ऑनलाइन सातबारा उतारा असल्याने तलाठी कार्यालयात सुद्धा नागरिकांना जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसूल होत नाही.