पुणे – शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकील अॅड. प्रमोद बोंबटकर यांची प्रमुख जिल्हा सरकारी वकीलपदी (डीजीपी) नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. सन २०२० नंतर अॅड. बोंबटकर यांच्या रूपाने पूर्ण वेळ ‘डीजीपी’ मिळाले आहे. मार्च २०२० ते २७ नोव्हेंबर २०२३ या काळात अॅड. एन. डी. पाटील यांच्याकडे प्रभारी पदभार होता.
अॅड. बोंबटकर १९९६ पासून वकिलीची ‘प्रॅक्टिस’ करीत आहेत. ते मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बोंबटकर यांचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण तेथेच झाले. त्यानंतर पुण्यातील ‘आयएलएस’ विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. १९९५मध्ये त्यांनी पदवी मिळवली. तर १९९६ पासून पुण्यात वकिली सुरू केली.
सुरुवातीला त्यांनी अॅड. दादासाहेब बेंद्रे यांच्याकडे वकिलीचा अनुभव घेतला. त्यानंतर स्वतंत्र्य काम सुरू केले. ते २०१६ पासून अतिरिक्त सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. सन २०१७ पासून त्यांनी मोक्का न्यायालयाचे विशेष वकील म्हणूनही जबाबदारी पार पाडली. कोल्हापूर परिक्षेत्रात मोक्का गुन्ह्याअंतर्गत पहिली शिक्षा झाली. त्या खटल्यात अॅड. बोंबटकर हे सरकार वकील होते. सध्या ते मोक्काच्या ८० गुन्ह्यांत काम पाहत आहेत.