पुणे, दि. 11 -पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अखेर उपाययोजना सुरू सुरू करण्यात आल्या आहेत. खड्डेमय रस्त्यांबाबत ओरड झाल्यानंतर प्रशासन ताळ्यावर आले आसून नादुरुस्त रस्त्यांवर डांबरीकरण वेगात सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, वाहतूक नियंत्रणास मदत म्हणून वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, प्राधिकरणामार्फत वाहतूक पोलीस विभागास बाणेर व गणेशखिंड रस्त्यावर नो पार्किंग तसेच वाहने उभी करण्यास, थांबण्यास बंदी घालण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातील काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्त्याचे बांधकाम करणे, अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.
पुण्याचे पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांनी मागील आठवड्यात प्रत्यक्ष केलेल्या स्थळ पाहणी केली होती. यामध्ये ज्या ठिकाणी प्रत्यक्षात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू नाही अथवा काम सुरू करण्यास वेळ आहे, अशा ठिकाणचे बॅरिकेड्स रस्त्याच्या मध्यभागी घ्यावेत व काम सुरु करणेच्या अगोदर पुन्हा बाहेर घ्यावेत, जेणेकरून अस्तित्वातील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, अशा सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने प्राधिकरणाचे व पुणे मनपाच्या प्रकल्प विभागाचे अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.9) व शुक्रवारी (11) रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.
यादरम्यान प्राधिकरणामार्फत मेट्रो कंत्राटदारास दिलेल्या सुचनेनुसार मेट्रो कंत्राटदाराने बाणेर गाव हद्दीमध्ये ज्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे, अशा ठिकाणी किमान आवश्यक असलेल्या रुंदीस बॅरिकेड्स करून उर्वरित भागातील बॅरिकेड्स रस्त्याच्या मध्यभागी घेतले वा बॅरिकेड्सची रुंदी कमी केली आहे. बालेवाडी ते शिवाजीनगर या लांबीमध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी 9 मी रुंदीने बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत.
40 महिन्यांत प्रकल्प पूर्ण होणार
करारनाम्यानुसार मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीने मेट्रो प्रकल्प 40 महिन्यांत पूर्ण करण्याचे बंधन आहे. त्यासाठी मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मेट्रोचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचे बॅरिकेड्स किमान आवश्यक रुंदीपेक्षा अजून रस्त्याच्या मध्यभागी घेणे शक्य नाही. ही परिस्थिती प्राधिकरण व मेट्रो कंत्राटदारांनी पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात दाखवली आहे, अशी माहिती पीएमआरडीएने दिली आहे.