– किरकोळ बाजारात आतापर्यंतचा उच्चांक
पुणे : परराज्यातून होणारी लसणाची आवक कमी झाल्याने लसणाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात लसणाची विक्री ४०० रुपये भावाने केली जात आहे. लसणाला उच्चांकी भाव मिळाल्याचे घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
लसणाचा हंगाम थंडी संपल्यानंतर होतो. मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची आवक पुणे, मुंबईसह राज्यातील बाजार समितीच्या आवारात होते. सध्या गुजरातमधील लसणाची आवक होत नाही. मध्यप्रदेशातून लसूण विक्रीस पाठविला जात आहे.
मागणीच्या तुलनेत लसणाची आवक अपुरी होत असल्याने लसणाच्या भावात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून टप्याटप्याने वाढ होत चालली आहे. घाऊक बाजारात १० किलो लसणाला १५०० ते २५०० रुपये मिळाले आहेत, असे मार्केट यार्डातील व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते संघटनेचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.
दर तीन ते चार वर्षांनी लसूण महाग होताे. गेल्या वर्षी लसणाला कमी दर मिळाला होता. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून लसणाची लागवड कमी प्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे परराज्यातील लसणावर अवलंबून रहावे लागत आहे, असे भुजबळ यांनी नमूद केले.
एक ते दीड महिना लसूण तेजीत
पुणे, मुंबईत लसणाला सर्वाधिक मागणी आहे. नवी मुंबई आणि पुण्यातील घाऊक बाजारात दररोज होणारी आवक अपुरी आहे. बाजारात सध्या चार ते पाच टेम्पो एवढी लसणाची आवक होत आहे. जानेवारी महिन्यानंतर नवीन लसणाची आवक सुरू होईल. किमान एक ते दीड महिना लसणाचे दर तेजीत राहणार असल्याचे घाऊक बाजारातील व्यापारी विलास भुजबळ यांनी नमूद केले.
पावशेर लसूण १०० ते १२० रुपये
घाऊक बाजारातून जादा दराने लसूण खरेदी करावा लागत आहे. परराज्यातून होणारी लसणाची आवक कमी प्रमाणावर होत आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून लसणाचे दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार पावशेर लसणाची विक्री १०० ते १२० रुपये दराने केली जात आहे. गेल्या काही वर्षात लसणाला मिळालेला हा उच्चांकी दर आहे, असे किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेतेे प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.