पुणे – उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल असताना ललित पाटील अलंकार चौकातील तारांकित हॉटेलमध्ये नियमीत येत जात होता, अशी माहिती पुढे आली. मात्र, पोलिसांनी सलग तीन ते चार दिवस संबंधित हॉटेलचे रेकॉर्ड तपासले, त्यामध्ये ललित पाटीलच्या नावाने रुम बुक केल्याचे आढळले नाही.
तर दुसरीकडे त्याचे परिचित, प्रेयसी, भाऊ आणि इतर ओळखीच्या नावाने रुम बुक केली गेली का? हेही तपासण्यात आले. मात्र, तसे रेकॉर्ड आढळले नाही. मात्र त्याने हॉटेलच्या लॉबीत बसून तीन महिन्यात तब्बल अंमली पदार्थाचे दहा ते अकरा व्यवहार केल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे पोलिसांनी आता आपला मोर्चा लॉबीतील सीसीटीव्ही तपासण्याकडे वळवला आहे.
वाहनचालकाला वॉर्ड नंबर 16 मध्ये मुक्त प्रवेश कसा ?
ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला पुण्याबाहेर सोडणाऱ्या मोटारचालकाला पोलिसांनी अटक केली. या वाहन चालकाचा वॉर्ड नंबर 16 मध्ये मुक्त प्रवेश असल्याची बाब पुढे आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने कैद्याला घरचा डबा मिळू शकतो. मात्र, तो थेट कैद्याच्या खोलीत त्याचा नातेवाईक नेऊन देऊ शकत नाही. तो पोलीस किंवा कर्मचाऱ्यामार्फतच पोहचवला जातो. मात्र चालकाला सकाळ -संध्याकाळ डबा आत नेऊन देण्याची मुभा होती. तसेच संस्थाचालक डबा खाऊन होईपर्यंत चालक आत थांबत होता.
ही धक्कादायक बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. दत्ता डोके, असे त्या मोटारचालकाचे नाव आहे. डोके शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाकडे चालक आहे. ससून रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी सव्वा दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर उपचार घेणारा कैदी पाटील ससून रुग्णालयातून गेल्या सोमवारी पसार झाला. पाटीलला पुण्याबाहेर मोटारीतून सोडण्यात आले होते.
पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात ही बाब उघड झाली. दरम्यान डोकेने पाटीलला मुंबई महामार्गावर सोडल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली, अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. दरम्यान डोकेला वॉर्ड नंबर 16 मध्ये मुक्त प्रवेश कसा मिळत होता? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.