पुणे –महापालिका सभागृहाची मुदत संपत असतानाच शेवटच्या 14 दिवसांसाठी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात भाजपकडून विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना सलग चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थायी समिती सदस्य प्रदीप गायकवाड यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दि.4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ही निवडणूक होणार आहे. तर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे नूतन अध्यक्षांसमोर 7 मार्च रोजी अंदाजपत्रक सादर करणार आहेत. दरम्यान, पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीत भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य असल्याने रासने यांचा विजय निश्चित समजला जात असून, ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरणार आहे.
रासने यांचा उमेदवारी अर्ज सादर करताना महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनील कांबळे, सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. तर, महाविकास आघाडीच्या वतीने गायकवाड यांचा अर्ज दाखल करताना विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेविका अश्विनी कदम, नगरसेवक विशाल तांबे, बंडू गायकवाड, शिवसेनेचे बाळा ओसवाल, कॉंग्रेसच्या स्थायी समिती सदस्य लता राजगुरू यावेळी उपस्थित होत्या.