पुणे – शहरात अनलॉक झाल्यानंतर पुणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यात अनेक ठिकाणी रस्ते खोदाईमुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. शिवाय, तापमानातील घट अशा कारणांमुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासाळली आहे. येत्या काही दिवसांत हे प्रमाण अधिक वाढण्याची भीती असल्याने, ऐन दिवाळीत पुणेकरांना प्रदूषित हवेचा सामना करावा लागणार आहे.
लॉकडाऊन काळात अतिशय कमी प्रमाणात असलेली हवेतील प्रदूषके आता हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. आयआयटीएम-सफर या संस्थेने घेतलेल्या नोंदीनुसार, शहरातील हवेमधील प्रदूषकांनी शंभरी ओलांडली आहे.
शहरातील हवेचा गुणवत्तांक 108 इतका आहे. त्यानुसार, हवेची गुणवत्ता काहीशी धोकादायक अवस्थेत पोहचली आहे. अभ्यासकांनी घेतलेल्या नोंदीनुसार, गुरूवारी दिवसभरात हवेतील “पीएम 10′ या प्रदूषकाचे प्रमाण 104 प्रति क्युबिक घनमीटर इतके नोंदविण्यात आले. येत्या दोन दिवसांत हे प्रमाण 125 प्रति क्युबिक घनमीटर इतकी होण्याची शक्यता संस्थेने वर्तवली आहे. त्याचबरोबर पीएम 2.5 या प्रदूषकाचे प्रमाण 63 प्रति क्युबिक घनमीटर नोंदविण्यात आले. येत्या दोन दिवसांत हे प्रमाण 76 प्रति क्युबिक घनमीटर होण्याची शक्यता आहे, असे आयआयटीएमने म्हटले आहे.
हवेच्या सद्यस्थितीचे आरोग्यावरील परिणाम
शहरातील हवेची गुणवत्ता सध्या “समाधानकारक’ या पातळीवरून “मध्यम’ पातळीवर घसरली आहे. अशा हवेत अधिक काळ राहिल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवण्याची शक्यता असते. विशेषत: श्वसनाचे विकार असलेल्यांना या हवेमुळे अधिक त्रास होऊ शकतो. लहान मुलांनादेखील विविध त्रासांचा सामना करावा लागण्याची भीती असते.
ही आहेत कारणे :
रस्ते खोदाईमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण
वाहतूक कोंडीमुळे वाहनांतून होणारे कार्बन उत्सर्जन
ढगाळ वातावरण आणि तापमानातील घट
विविध भागांमधील पीएम 10 चे प्रमाण (प्रति क्युबिक घन मीटरमध्ये)
शिवाजीनगर115
हडपसर121
भूमकर चौक (वाकड)132
निगडी109
भोसरी106
कात्रज101
लोहगाव99
पाषाण96
आळंदी79
कोथरूड45