पुणे – सिंहगडाच्या घाट रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओच्या वायुवेग पथकाने कारवाई केली. त्यामध्ये १३ वाहने दोषी आढळून आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सिंहगडावरील रस्त्यावरून खाली येताना एका मोटारीचा अपघात होऊन १० ते १२ जण जखमी झाले होते. सुदैवाने मोठी हानी टळली होती. त्यावेळी सिंहगडावरील अवैध प्रवासी वाहतूकीकडे आरटीओ आणि वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले.
वनविभागाने या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली तरी त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. या अपघातानंतर तरी आरटीओला जाग येणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. त्यानंतर बुधवारी (दि. २०) आरटीओच्या पथकाने सकाळपासूनच या रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाईला सुरूवात केली. दिवसभारत या कारवाईत १३ वाहनांकडून नियमांचा भंग केला असल्याचे आढळून आले. या वाहनांवर आरटीओने कारवाई केली आहे. घाट रस्त्यावर आरटीओची कारवाई सुरू झाल्यानंतर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही गाड्या गायब झाल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई सतत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.