पुणे – लोणीकंद परिसरातील न्यू प्यासा बारमधील एका कर्मचाऱ्यासह चालकाने लोणीकंद पोलीस ठाण्यासमोर पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी आत्महत्या करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तर हॉटेल चालकाने एक व्हिडिओ जारी करत महिला पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे एकच खळबळ माजली आहे. पोलीस सहकार्य करत नसल्याच्या कारणावरुन एका तक्रारदाराने पोलीस चौकीसमोरच पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला.
पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीनूसार, पोलीस शिपाई अमोल आबासाहेब गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. तर सत्यराम हौसिराम गावडे (३४) आणि राम अशोकलाल गजमल (३१,रा. उबाळेनगर, वाघोली) या दोघांविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सोमवारी साडेपाचच्या सुमारास लोणीकंद पोलीस स्टेशन मेन गेटचे समोर घडली. पोलिसांनी सांगितले की, उबाळेनगर येथील न्यु प्यासा हॉटेलवर पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिमा ढाकणे यांनी रात्री उशीरापर्यंत हॉटेल चालु असल्याने त्यांचे हॉटेल मधील कामगार राम गजमल यांच्यावर खटला भरुन कारवाई केली होती.
याचा राग मनात धरुन गजमल आणि हॉटेल चालक गावडे यांनी स्वतःचे अंगावर कोणतातरी ज्वलनशील पदार्थ ओतुन घेऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. तर हॉटेल चालकाने एक व्हिडिओ जारी करत म्हटले की, ‘माझा बार लिगल आहे. मात्र तो चालू ठेवण्याकरीता ढाकणे यांनी दरमहा दहा हजारची मागणी केली. त्यांच्या हप्तेखोरीला कंटाळून मी आत्मदहणाचा प्रयत्न केला.’