पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) विना अपघात विना तक्रार बस सेवा देणार्या चालकांना यावर्षी विशेष सन्माने गौरविण्यात येणार आहे. राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत पीएमपीकडून येत्या 24 जानेवारी रोजी पुण्यात चालक दिन साजरा करण्यात येणार असून, पहिल्यांदा असाप्रकारे चालक दिन साजरा करत चालकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
पीएमपी बस म्हटल्यावर पादचर्यांपासून वाहनचालक दोन हात लांबच असतात. कोण कधी धडक देईल, घासून जाईल याची शाश्वती नाही. त्यात पीएमपी अपघाताच्या घटना पाहता अंगावर काटा येतो. मात्र, एकीकडे ही प्रतिमा असली तरी पीएमपीमध्ये अनेक चालक हे सुरक्षित आणि विनम्रपणे प्रवाशांना सेवा देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे चांगली सेवा देणार्यांचे कौतुक करून, त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची पाठ थोपटणे महत्वाचे. तसेच यातून अन्य चालकांमध्येही सुधारणा होईल आणि प्रवास सुरक्षित होण्यास मदत होईल.
त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या रस्ता सुरक्षा अभियानात येत्या 24 जानेवारील चालक दिन साजरा करून चांगली सेवा देणार्या चालकांचा गौरव करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक डेपोतून १ असे एकूण 15 उत्कृष्ट चालकांचा गौरव 24 जानेवारीला करण्यात येणार आहे.
“विना अपघात आणि विना तक्रार बस सेवा देणार्या 15 उत्कृष्ट चालकांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व डेपोकडून माहिती मागविण्यात आली असून, अंतीम यादीनुसार प्रत्येक डेपोतून एक असे चालकाची निवड करून गौरव करण्यात येणार आहे.”- नितीन नार्वेकर – सह व्यवस्थापक पीएमपी पुणे