पुणे -राज्य शासनाकडून परवानाधारक रिक्षाचालकांना सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. ते थेट बॅंक खात्यात येत असून, यासाठी आधार क्रमांक बॅंक खात्याला जोडणे आवश्यक आहे. मात्र, अनेक रिक्षाचालकांचे कार्ड खात्याला जोडले नाही. त्यामुळे आता अनुदानासाठी पात्र असणाऱ्या रिक्षाचालकांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात आधार जोडणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
करोनामुळे रिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. या अनुषंगाने राज्य सरकारकडून रिक्षा परवानाधारकांना 1500 रुपये सानुग्रह देण्यात येत आहे. याबाबतची प्रक्रियादेखील मागील आठवड्यात सुरू झाली. हे अनुदान थेट बॅंक खात्यात येत असून, यासाठी आधार क्रमांक बॅंक खात्याला जोडणे आवश्यक आहे. मात्र, अनेक रिक्षाचालकांचे कार्ड खात्याला जोडले नाही, तर अनेक चालकांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी आहेत.
त्यामुळे त्यांना अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ऑटो रिक्षासाठीच्या सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत आधार जोडणी केंद्र कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या सानुग्रह अनुदानाचा लाभ अनेक रिक्षाचालक घेत आहेत. मात्र, अनेक रिक्षाचालकांकडे आधार कार्डची परिपूर्ती नसल्याने त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत. हे अनुदान मिळण्यासाठी बॅंक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणीही रिक्षाचालक सानुग्रह अनुदानापासून वंचित राहू नये.
या भूमिकेतून जिल्हाधिकाऱ्यांनी दोन आधार केंद्र चालकांची नियुक्ती कार्यालयात केली आहे. आधार कार्ड संबंधित अडचणी असणाऱ्या रिक्षाचालकांचे आधारकार्ड कार्यालयात दुरुस्त करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आणि परिवहन आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहणार नाहीत याबाबत दक्षता घेत आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.