पुणे – उत्तमनगर भागात दहशत मजविणाऱ्या तसेच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एका अट्टल गुन्हेगारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी स्थानबध्दतेची कारवाई केली. चेतन लक्ष्मण चव्हाण (२२, रा. इंगळे कॉलनी,शिवणे ) असे एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याची रवानगी अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे करण्यात आली आहे. चेतन चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
त्याने साथीदारासह उत्तमनगर, बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिस्तूल, तलवार, धारदार हत्यार या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापत करणे, दुखापत, दंगा, बेकायदा पिस्तूल व हत्यारे बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
चव्हाण याला स्थानबध्द करण्याचा अहवाल उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांनी तयार केला होता. तो अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही ६६ वी कारवाई आहे.