पुणे – दत्तवाडी पोलीस ठाण्यातील दाखल केस मिटविण्यासाठी 50 हजारांची रक्कम स्वीकारली. या प्रकरणातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह नाईकासह न्यायालयाने तीन वर्षे कारावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी हा आदेश दिला.
विठ्ठल शिवाजी शिगटे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) व दत्तात्रय विठोबा नाईक (पोलीस नाईक) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे. या दोघांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल केस मिटवण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती त्यांनी 5 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यांपैकी 50 हजार रुपये सदाशिव पेठ येथील एका उपहारगृहात 25 एप्रिल 2014 रोजी स्वीकारताना ऍन्टि करपश्नच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली.
त्यानंतर त्यांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. सरकारी पंच साक्षीदार यांची साक्ष न्यायालयाने कोणत्याही साक्षीदाराच्या कागदपत्राशिवाय ग्राह्य धरावी, असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा साळवी यांनी दिला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.