पुणे – एटीएम कार्डमधून पैसे काढण्याच्या हेतूने डोक्यात आणि तोंडावर दगड मारून खून केल्या प्रकरणाचा निकाल पाच वर्षांनी लागला आहे. सबळ पुराव्याअभावी दाम्पत्यासह तिघांची सत्र न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी निर्दोष मुक्तता केली.
उत्तम गाढवे (वय 28), त्याची पत्नी आणि विशाल विश्वास काळे (26, रा. येरवडा) अशी तिघांची नावे आहेत. बचाव पक्षातर्फे ऍड. सुनीता बन्सल, ऍड. विपुल दुशिंग, ऍड. जितेंद्र जानापुरकर, ऍड. नितिश चोरबेले आणि ऍड. विष्णू सावंत यांनी बाजू मांडली. मोहन गोपीनाथ शेनॉय (वय 40, रा. येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे.
2 ऑगस्ट 2015 रोजी शेनॉय याला दारू पाजून नशेत त्याचे अपहरण करून उत्तम याने विशाल याच्या मदतीने खून केला. एटीएममधील 1 लाख 99 हजार 600 रुपये आणि मोबाइल मिळून 2 लाख 15 हजार 940 रुपयांची चोरी करण्यात आली होती. उत्तमच्या पत्नीने पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.