पुणे – शहरात मंगळवारी करोना चाचणीने तब्बल पाच लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामध्ये बाधित सापडण्याचे प्रमाण 21.96 टक्के आहे. जुलैनंतर सप्टेंबरमध्ये बाधितांचे आणि मृत्यूचे प्रमाण पुन्हा वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरात मंगळवारी बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्याची संख्या अधिक आहे. 2 हजार 22 बाधित करोनामुक्त झाले आहेत. तर आज 1 हजार 880 नव्याने बाधित सापडले आहेत. गेल्या 24 तासांत 35 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
मंगळवारी (दि.8) दिवसभरात 5 हजार 486 संशयिताची तपासणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 5 लाख 257 जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील 1 लाख 8 हजार 838 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत करोनामुळे 2 हजार 584 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 90 हजार 601 बाधित बरे झाले आहेत. शहरात 16 हजार 653 बाधित सक्रिय असून, त्यातील 912 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.