जिनिव्हा – जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यिएचओ) व भारता दरम्यान करोना लशीबाबत चर्चा सुरू आहे. कोवॅक्स सुविधेचा हिस्सा बनण्याचा भारतालाही हक्क आहे, असे संघटनेचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस आयलवर्ड यांनी सांगितले आहे.
करोनाच्या धोक्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या लस विकसित करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. लस विकसित झाल्यानंतर त्याचे योग्य वितरण झाले पाहिजे यासाठीही संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत.
कोवॅक्स सुविधेच्या माध्यमातून जगभरात करोनाला अटकाव करणाऱ्या लस खरेदी करणे आणि त्याच्या वितरणात मदत करण्यात येणार आहे.
अमेरिकेसह अनेक देशांनी लस विकसित करणाऱ्या अनेक कंपन्यांसोबत थेट लस खरेदीचा करार केला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात पहिली लस उपलब्ध होऊ शकते. कोविड-19 वरील एक लस क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात लस उपलब्ध होईल, असे भारताचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.
लस विकसित करणे, उत्पादन करणे याबरोबरच त्याचे योग्य वितरण करणे हे केवळ संघटनेचेच काम नसून त्यासाठी सर्व जगाने एकत्र येण्याची गरज आहे, असे संघटनेने म्हटले आहे.