पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. सध्यस्थितीत पश्चिम भागातील रिंगरोडसाठी ३२ गावांमधील ६३१ हेक्टर जागेपैकी ३४३ हेक्टर जागा ताब्यात आली आहे. येत्या जानेवारी अखेरपर्यंत उर्वरित जागेचा ताबा एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीकडून रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. पश्चिम आणि पूर्व अशा दोन टप्प्यांत प्रकल्प करण्यात येणार असून, पश्चिम मार्गावरील जमिनीचे संपादन करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तर पूर्व मार्गावर असणाऱ्या स्थानिकांना नोटीस देऊन भूसंपादनाची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे. पश्चिम मार्गावरील रिंगरोडची रचना बदलल्याने तीन गावांची भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित राहिली होती. त्याबाबतही कार्यवाही करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.