पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा 5 सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे. यासाठी 15 हजार 538 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तसेच, सेट-नेट उत्तीर्ण असलेल्या 4 हजार 117 विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेपासून (पेट) सवलत देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या चारही विद्याशाखांमधून एकूण 5 हजार 333 पीएचडी प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत. यासाठी पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले होते. पेट परीक्षेसाठी 12 जुलैपासून अर्ज करण्याची सुरुवात झाली. त्यानंतर 21 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानुसार 15 हजार 538 विद्यार्थ्यांची पेट परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती शैक्षणिक प्रवेश विभागाने दिली. सेट अथवा नेट झालेल्या विद्यार्थ्यांना पेट परीक्षेपासून सवलत दिली जाते. असे 4 हजार 117 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
पेट परीक्षा पूर्णत: ऑनलाइन पद्धतीने येत्या रविवारी घेण्यात येत आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी 2 ते 8 या वेळेत, तर अन्य विद्याशाखांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्यात येतील. 100 गुणांची ही प्रवेश परीक्षा होत असून, त्याचा निकाल 8 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.
विद्याशाखा सवलत पात्र विद्यार्थी पात्र विद्यार्थी एकूण विद्यार्थी रिक्त जागा
विज्ञान, तंत्रज्ञान 1544 7277 8821 3131
वाणिज्य, व्यवस्थापन473 2827 3300 1013
मानवविज्ञान 1550 4285 5835 985
आंतरविद्याशाखीय अभ्यास550 1149 1699 204
एकूण 4117 15538 19655 5333